Wednesday, April 11, 2018

एका प्रेमाची गोष्ट

तर गर्दीतल्या मल्टीप्लेक्स मध्ये त्याचा हात हातात धरून ती आत गेली तेव्हा मुव्ही सुरु होऊन सगळीकडे अंधार पसरला होता. त्याच्या हाताचा आधार घेत हळूवार पाऊले टाकत ती मागच्या बाजूला बुकिंग केलेल्या सीटवर जाऊन बसली. काही वेळ गेल्यावर त्याच्या खांद्यावर मान टेकवत ती हळूच म्हणाली,
“खरं तर माझी खूपच घुसमट होत होती रे! आज खूप बरं वाटतय!”
“तुला मुव्ही आवडतो ना! म्हणून घेऊन आलोय!”
“मुव्हीपेक्षा तू सोबत असलास ना! सारं जग जवळ असल्याचा भास होतो बघ!
“अगं किती प्रेम करतेस माझ्यावर! इतका जीव लावणे काही बरे नाही!”
“काय करणार रे! अशीच आहे मी! वेडी आहे ना मी!”
“तू पण ना? खरच! वेडीच आहेस तू!”
“एक खरं सांगशील?
“बोल ना! मी काहीच नाही लपवित तुझ्यापासून!” म्हणत त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला.
“तुझ्या आयुष्यात दुसरी कोणी तर नाही ना?”
“तुला काय वाटतं?”
“माझा विश्वास आहे रे तुझ्यावर! पण सांग ना असच?”
“एक मुलगी आहे अजून!”
“ये गप्प रे! मला खूप भीती वाटते! नाव सांग बरं तिचं!” त्याला घट्ट बिलगत ती म्हणाली.
“फक्त तूच आहेस!” तिचा हात दाबत तो म्हणाला.
“ऎक ना?”
“बोल!”
“आपल्या मागे जी बाई बसलीय ना! मघापासून ती माझ्या पायांना धक्के देतेय!”
“अरे चुकून लागत असेल! तू नको लक्ष्य देऊस!”
“बघ ना खाली वाकून! आतासुद्धा तिचा पाय माझ्या पायावर आहे!”
“अगं तिलाही तुझ्यासारखं कोणीतरी मिठीत घ्यावं असं वाटत असेल! भुकेली असेल बिचारी!”
“काहीही हं!”
“तुला नको असेल तर माझ्या पायांना धक्का द्यायला सांग तिला!”
“गप्प रे! नालायक कुठला!”
“इंटरव्हल कधी होणार गं!”
“होईल ना! तुला कसली एवढी घाई! कितीतरी दिवसांनी असा एकांत मिळालाय!”
“आता येत जाईन मी! प्रत्येक फ्राईडेला तुझ्यासोबत!”
“ए प्लीज! सांग ना तिला? पायांना चप्पलचे धक्के देतीय खालून!”
“अगं तू बोल ना तिच्याशी! मी कसं सांगणार तिला?
“अरे हि बाई मघाशी आपण बाहेर कोल्ड्रिंक्स पिताना सारखी पहात होती दोघांकडे?”
“हो का?” म्हणत त्याने मागे वळून पाहिले. आणि क्षणात तिचा हात हातातून सोडवत घामजलेला चेहरा पुढे करून शांत बसला.
“का रे! ओळखीची आहे हि ती?”

... इतक्यात मागून त्या बाईचा आवाज आला, “सटवेsss! त्याची बायको आहे मी! पाळतीवर आहे दोघांच्या! चालुद्या अजून तुमचं...!

#ज्ञानदेवपोळ

Photo:scoopwhoop

No comments:

Post a Comment