Sunday, March 18, 2018

एका व्हीलचेअरचा प्रवास...

जगावर दुसऱ्या महायुद्धाचे ढग गळत असताना फ्रेंक आणि इझाबेल या मध्यम वर्गीय उच्च शिक्षित आई वडिलांच्या पोटी एक चुणचुणीत पोरगा जन्माला आला त्याचं नाव होतं स्टीफन हॉकिंग. या स्टीफनच्या जन्माची तारीख होती ८ जानेवारी १९४२. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती बेतातीच होती. गणित आणि विज्ञानाच्या प्रतिभेने जन्मताच काठोकाठ भरलेल्या या मुलाला लहान पणापासूनच संगीत आणि वाचनाची विशेष आवड होती. गणित आणि भौतिकशास्त्र तर त्यांच्या आवडीचे विषय होते. शाळेत असताना स्टीफनला ‘आइनस्टाइन’ या टोपन नावानं ओळखलं जाऊ लागलं. त्यांनी लहानपणी शाळेत आपल्या मित्रांच्या मदतीने टाकाऊ वस्तूंचा वापर करून कॉम्प्युटर तयार केला होता. लंडनच्या सेंन्ट अल्बान्स या शाळेतील शिक्षणानंतर ब्रिटन मधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांने पदवी संपादन केली. पुढे उच्च शिक्षणासाठी हा तरुण केंब्रिज विद्यापीठाच्या दारापर्यंत दाखल झाला.

वाढणाऱ्या वयासोबत स्टीफन एकवीस वर्षाचा झाला. सर्व काही सुरळीत चालू असताना एका सुट्टीच्या दिवशी स्टीफन आपल्या घरी परतला. एका रिकाम्या वेळेत तो शिडीवरून उतरत असताना घसरला आणि तेथेच बेहोष झाला. तेथूनच स्टीफन हॉकिंग या नावाचा झंझावात सुरु झाला. अनेक डॉक्टरांना दाखवूनही त्याच्या आजाराचे निदान काही लवकर झालेच नाही. त्याचा एकविसावा वाढदिवस सुरु असतानाच नियतीने त्याला एका दुर्मिळ नव्या आजाराचे गिफ्ट कायमस्वरूपी बहाल केले. त्या दुर्मिळ गिफ्ट दिलेल्या आजाराचे नाव होते “मोटर न्यूरॉन डिसीज.” याच आजाराने अफाट बुद्धिमता लाभलेला इंग्लड मधला हा तरूण कायमस्वरूपी अंथरुणाला लपेटून बसला. आता जगण्याला अर्थच उरला नव्हता. प्रचंड निराशेत स्टीफन दिवस ढकलू लागला. त्याच्याच शेजारी असंख्य आजारांनी ग्रासलेल्या एका रोग्याची जगण्यासाठी अखंड चाललेली धरपड पाहून त्याला जीवनाविषयी, या जगाविषयी पुन्हा आशेचे किरण दिसू लागले. डॉक्टरांनी सांगितल्या नुसार दोन वर्षात आता आपला मरण आता अटळ आहे हे माहित असून हि या तरुणाने जगण्याची उमेद सोडली नाही. काही कालावधीच हा तरुण जगाचा निरोप घेणार हे माहित असतानाही त्याच्या जेन वाईल्ड नावाच्या प्रेयसीने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्टीफन विवाहबद्ध झाले. आता जेन नावाची जादू तर त्यांच्या जगण्याचा नवा आधार बनली.

व्हीलचेअरचा आधार घेत स्टीफन नंतर केंब्रिज विद्यापीठात प्रोफेसर बनले. त्या तरुणाचे रुपांतर आता एका प्रोफेसरमध्ये झाले होते. अंथरुणाला चिकलेला आणि प्रचंड विज्ञानाने भरलेल्या मेंदूचा हा माणूस नव्या जगण्यासाठी जागेवरून उठून व्हील चेअरचा आधार घेऊन जगू लागला. नव्हे नुकताच जगला नाही तर त्या काळात त्यांची वैज्ञानिक म्हणून साऱ्या जगात कीर्ती पसरली. गणित, विज्ञान, भौतिकशास्त्रात त्यांनी अनेक संशोधने केली. विश्वाच्या निर्मितीचे रहस्य उलगडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आण्विक शक्ती, आणि सतत होणाऱ्या पृथ्वीवरच्या रासायनिक हल्ल्यांमुळे एक दिवस पृथ्वीचा विनाश अटळ असेल इथपर्यंत त्यांचे संशोधन पोहचले.

याच काळात हळू हळू शरीर त्यांची साथ सोडू लागले. अशा परिस्थितीत वेळोवेळी त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया होत गेल्या. श्वास नलिकेला छिद्र पाडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. त्यांना गिळताना प्रचंड त्रास होऊ लागला. अखेर एक दिवस नियतीने डाव टाकून त्यांचा आवाजही त्यांच्यापासून हिरावून नेला. या आजाराने त्यांच्या शरीरिक हालचाली बंद पडल्या. एका हाताच्या बोटांची काहीशी हालचाल करता होत असे. त्या बोटांचा वापर करून ते संगणकावर काम करत असत. संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन या त्यांच्या मित्राने त्यांच्या व्हील चेअरलाच एक संगणक जोडला. त्यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून कार्यरत करण्यात आली. याच तंत्रज्ञानाच्या आणि संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून स्टीफन यांना गळ्यातून बोलणे शक्य झाले. व्हाईस सिंथेसायझरच्या माध्यमातून ते पुढे बोलत राहिले. गंमत म्हणजे स्टीफन ब्रिटीश असूनही त्यांच्या सिंथेसायझरमधील त्यांचा आवाज हा पूर्णपणे अमेरिकन धाटणीचा होता. 

व्हीलचेअर समोरच्या बसवलेल्या याच माईकच्या ऐतिहासिक जागेवरून पुढे त्यांच्या जगण्याचे आणि संशोधनाचे शेकडो नवे अध्याय जगाने आजपर्यंत पाहिले. अनुभवले. लुळे पडलेले शरीर अंगावर घेऊन आणि मेंदूत असलेला ‘एकशे साठ आय.कू’ चा वापर करून स्टीफन यांनी काय नाही केले. त्यांनी अनेक नवे शोध लावले. बिग बॅंग थेअरीचा सिद्धांत त्यांनी मांडला. क्वांटम मेकॅनिक्स आणि सापेक्षतावाद एकाच सिद्धांतामध्ये मांडण्याचा पर्यंत केला. सैद्धांतीक भौतिकशास्त्रात त्यांनी जगाला मोलाचे योगदान दिले. विश्वाच्या निर्मिती पासून ते आकाशातील कृष्णविवरे कशी तयार होत असतील इत्यादी अनेक गोष्टींचा त्यांनी शोध घेतला. मानवाला न उकलणाऱ्या ब्रह्मांडातल्या गूढ रहस्यांचाही शोध घेण्याचा आणि चिंतनाचा त्यांनी आयुष्यभर ध्यासच घेतला होता. ब्रह्मांडाच्या उत्पतीबाबतचे त्यांचे शोध आणि विचार बऱ्याचशास्त्रज्ञानी स्वीकारलेले आहेत. 

अंतरिक्ष आणि पदार्थ विज्ञानाच्या क्षेत्रात तर त्यांनी वैश्विक मान्यताच मिळवली. जगातील पहिल्या दहा सर्वोत्तम वैज्ञानिकांमध्येही त्यांची गणना होत होती. 1988 साली “ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम” या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या जगभरात लाखो आवृत्या रातोरात खपल्या. यामध्ये त्यांनी बिग बँग आणि कृष्णविवरासंदर्भात सविस्तर विवेचन केले होते. तर दुसरीकडे या पुस्तकातून त्यांनी ईश्वराचं अस्तित्वच नाकारल्याने त्यांच्यावर त्या काळी प्रचंड टीकाही झाली. “लाईफ इन द युनिव्हर्स” या पुस्तकात परग्रहावरचे एलियन आणि मानव यांची भविष्यात भेट होईल असेही भाकीत केले आहे. त्यांनी विज्ञानाविषयीची जशी अनेक पुस्तके लिहिली तशीच त्यांनी लहान मुलांसाठीही पुस्तके लिहली. विशेषता ‘जॉर्जस सिक्रेट की टू युनिव्हर्स' , 'जॉर्जस कॉस्मिक ट्रेझर हंट' ही या त्यांच्या पुस्तकातील लेखन लोकप्रिय ठरले.

स्टीफन यांच्या वैवाहिक आयुष्यातील अनेक दु:खद प्रंसग जगाने आजपर्यंत अनुभवले. १९९५ मध्ये त्यांच्या जगण्याचा आधार असलेली जेन वाईल्ड या त्यांच्या पत्नीने त्यांच्यापासून कायमची फारकत घेतली. स्टीफन आणि जेन यांचा दोन तपाहून जास्त चाललेला संसार मोडला. नंतर इलियाना मेसन स्टीफन त्यांच्या आयुष्यात आली. पण २००६ च्या आसपास ती हि त्यांना सोडून गेली. पण स्टीफन जगत राहिले. नंतर तर ते नासाच्या स्टेशन मधून उंचही उडाले. २००७ मध्ये त्यांनी शून्य गुरूत्त्वाकर्षण शक्तीचा अनुभव घेतला. जवळ जवळ चार तपाहून अधिक काळानी ते प्रथमच व्हिलचेअरवरून उठून हवेत तरंगण्याचा अनुभव घेत होते.

2011 मध्ये 'गार्डियन'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “गेली पन्नास वर्षे रोज मृत्यूच्या छायेत असूनही मी अजून जिद्दीने जगतो आहे. मी कधीही मृत्यूला घाबरत नाही. आणि मला अजून मरणाची घाईही नाही. कारण या जगातून निघून जाण्यापूर्वी मला अनेक कामं करायची आहेत”. म्हणूनच व्हीलचेअरच्या एका जागेवर आयुष्यभर ज्ञान विज्ञानाचा ध्यास घेऊन बसून राहिलेली त्यांची जिवंत मूर्ती ही जगात कौतुकाचा विषय ठरली.

आजारानंतर दोन वर्षापर्यंतच आयुष्य लाभलेला असा हा न्यूटन चा वारसदार अखेर ‘मोटर न्यूरॉन डिसीज’ नामक आजाराची ‘मेलेली लाश’ अंगावर घेऊन पुढे पन्नास वर्षे जगला आणि अखेरीस नियतीच्या यानातून हा झंजावात पृथ्वीच्या कक्षेबाहेर कायमचा निघून गेला...

#ज्ञानदेवपोळ


No comments:

Post a Comment