Wednesday, March 14, 2018

उंच उडालेले 'पतंग' राव

बाळंतपणात सून मेली आणि जन्माला आलेल्या नातवाला म्हातारीनं स्वताच्या थानाला लावलं. पोरगं नुसतच थानं वडायचं. पण दूध काय याचं नाय. घरात प्रचंड दारिद्य. दूध विकत घेऊन पाजायला पैसे नाहीत. अशा परिस्थितीत त्या म्हातारीने दुसऱ्याच्या बांधला हाडं घासून नातू मोठा केला. ग्रॅज्युयटपर्यंत शिकवला. घरात खायापियाचे वांदे. आता नातवाला कुठेतरी नोकरी मिळेल आणि घराला चांगले दिवस येतील या आशेवर म्हातारीनं इथपर्यंत रोजगार करून कसंतरी रेटलं. पण जगाच्या बाजारात नातवाला नोकरी देणार कोण? नातवानं नोकरीसाठी हजार उंबरे झिजवले. पण काही उपयोग झाला नाही. मग एका बाजारी म्हातारीने घरातली पितळेची भांडी नेऊन मोडली. आलेल्या पैशातून पुण्याला जायचा तिने निर्णय घेतला.

खेडेगाव सोडून उभ्या आयुष्यात शहर कधीच न पाहिलेली म्हातारी सांगली जिल्ह्यातल्या एका खेडेगावातून नातवाला घेऊन स्वारगेटला दिवस मावळायला उतरली. हातात एक कापडी पिशवी. त्यात वाळलेल्या भाकरी आणि चटणीची भुकटी. ती ज्या व्यक्तीला भेटायला आली होती त्या व्यक्तीच्या घराचा पत्ता विचारत विचारत सदाशिव पेठेतून पुढे लकडी पूल ओलांडून म्हातारी नातवासोबत डेक्कन कॉर्नरला आली. पण कोण म्हणायचं ती व्यक्ती कात्रजला राहती तर कोण म्हणायचं याच परिसरात राहती.

रात्रीच्या अकरा वाजता म्हातारी बी.एम.सी.सी कॉलेजच्या समोर एका छोट्याशा एकमजली बंगल्यासमोर पोहचली. रात्र झाल्याने बंगल्यात सामसूम. गेटवर असलेल्या वॉचमेनला म्हातारीनं हात जोडलं आणि म्हणाली,"लई लांबचा प्रवास करून आलीय बाबा! तेवढी सायबाची भेट घालून दे!तुज्या पाया पडती!" पण तुम्हाला आता भेटता येणार नाही. साहेब कधीच झोपलेत. तुम्ही सकाळी साहेबांच्या ऑफिसला जाऊन भेटा. असं त्या वॉचमेननं सांगितलं. पण काही झालं तरी येथून हलायचं नाही असं ठरवून आलेली म्हातारी तिथंच रस्त्याच्या कडेला नातवाला घेऊन बसून राहिली.

मध्यरात्री दोनची वेळ. सारं पुणे गाढ झोपेत गेलेलं. रस्त्याच्या कडेला अंधारात नातवासोबत डोळे लुकलुकत बसलेली म्हातारी. अशातच बंगल्यातील ती व्यक्ती जागी झाली. खिडकीतील नजरेने रस्त्यावर वडाच्या झाडाखाली बसलेली गावाकडची म्हातारी त्या नजरांनी बरोबर टिपली. एका क्षणात त्या बंगल्याच्या लाईटा पेटल्या. रात्रीच्या दोन वाजता त्या व्यक्तीने बंगल्याच्या खिडकीतून त्या म्हातारीला हाळी मारली. आणि पेंगाळून गेलेली म्हातारी क्षणात जागी झाली. अंगात गावाकडची बंडी आणि पट्ट्या पट्ट्याची साधी विजार घातलेली ती व्यक्ती खाली आली. मध्यरात्री वॉचमेनला चार शिव्या टाकून त्या म्हातारीला त्या व्यक्तीने स्वतः रस्त्यावर येऊन घरात नेली. ज्या व्यक्तीने त्या म्हातारीला घरात घेतली त्या व्यक्तीचं नाव होतं डॉ.पतंगराव कदम...

प्रचंड दारिद्र्यात आणि दुष्काळी पट्ट्यातल्या मातीत जन्माला येऊन आपल्या खेडवळ मातीतल्या माणसांना ओळखणारी ती व्यक्ती पतंगराव कदम होती. रात्रीच्या अडीच वाजता फुलागत जपलेल्या त्या म्हातारीच्या नातवाला त्याच्या राहण्या खाण्यासहित, स्वतःच्या शिक्षण संस्थेत फुकट नोकरी देणारा नेता या आधीही कधी महाराष्ट्रात जन्माला आला नाही आणि पुढेही येणार नाही. अशा हजारो नाही तर लाखो गरीब कुटुंबाना भाकरी मिळवून देणारा राजकारण आणि समाजकारणातला हा भक्कम वृक्ष आता कायमचा उन्मळून पडलाय....
शेवटी वृक्ष कोसळल्यावरच कळतं की तो किती उंच गेला होता...

No comments:

Post a Comment