Wednesday, February 7, 2018

अलविदा केलेल्या आठवणी...

माहेरात येऊन चार दिवस उलटले तरी तो कुठेच दिसेना म्हंटल्यावर ती आणखी काळजीत पडली. त्याच्या आठवणीनं जास्तच व्याकुळ झाली. अखेर काल संध्याकाळी मागच्या गल्लीतनं हातात बैग घेऊन जाताना तिला अंधारात तो दिसला आणि मुद्दाम वाट वाकडी करून ती त्याला आडवी गेली अन आवाज दिला...
“रविंद्रss.”
“प्राजक्ताss.”
“कसा आहेस?”
“आहे बरा…तू कधी आलीस?”
“चार दिवस झालं.”
“बरं हाय का तुझं?”
“बरं नसाय काय झालं?”
“तसं न्हवं! सासरची माणसं हाईत का चांगली?”
“अजून तरी चांगलीच हाईत.”
“मग आहेस ना सुखात!”
“जसा तू आतून असशील तशीच मी पण आहे!”
...क्षणभर कोणीच बोललं नाही मग प्राजक्ताच म्हणाली,
“मला तू लवकर विसरलास!”
“हवं तर तसं समज आता!”
“अजून गेला नाही का राग?”
“राग कसला! तुझ्या आयुष्याचा तू योग्यच निर्णय घेतलास! बेरोजगार तरुणाशी लग्न करून तुला शेवटी पश्चातापच झाला असता!”
“तुझ्या नोकरीचं जमतच नव्हतं! मी तरी किती दिवस थांबणार रे!
“बरं… जाऊ का मी? एस.टी चुकेल माझी.
“कुठे निघालायस?”
“जायाचं पोटाच्या मागं हिंडत....”
“असं कोड्यातलं नको रे बोलूस! मिळाली नोकरी?”
“नाही अजून!”
“शहरात पोहचल्यावर आमच्या यांना भेट ना एखदा! ओळखीनं बघतील कुठेतरी?”
“तुझ्या संसाराच्या वळचणीखाली थांबून आयुष्याला पुन्हा दुख:ची अंघोळ घालायची नाही मला!”
“पण नव्या आयुष्यात मित्र बनून जवळ राहू शकतोस ना?”
“जुन्या नात्यांना नवी लेबलं लावून जगण्यापेक्षा फकीर बनून जगायला आवडेल मला!”
“पण छळणाऱ्या आठ्वणींचं काय?”
“चल विसरून जाऊ त्यांना! नाहीतर सीझर केलेल्या काळजावरचे टाके कधीच गळालेत! आता हे हि दिवस बरे वाटताहेत...”
...तो धपाधपा पावलं टाकत एका वळणावर अंधारात गुडूप्त झाला आणि ती जड पापण्यातून पुन्हा पुन्हा त्याला पहातच राहिली...

#ज्ञानदेवपोळ

प्रातिनिधिक फोटो 

No comments:

Post a Comment