Tuesday, January 23, 2018

गोष्ट १६ एमएम सिनेमांची


पूर्वी गावागावात लग्नकार्ये, भंडारा, गणपती, यासारखे अनेक छोटे मोठे उत्सव साजरे व्हायचे. या कार्यक्रमात मनोरंजनाचे हमखास साधन असायचे ते पडद्यावरचा 16 एमएम चा सिनेमा. गावात रात्री पडद्यावर सिनेमा असला की भर दुपारी पारापुढच्या दगडी दीपमाळेवर लाऊड स्पिकरचे जर्मनी कर्णे वर चढायचे. काही वेळातच लाऊड स्पिकरमधून पुकारण्याचा आवाज बाहेर पडला की गावासहित रानामाळात असलेल्या लोकांचे श्वास जाग्यावर थांबायचे. हात विश्रांती घ्यायचे. कान उभे राहायचे. स्पिकरच्या आवाजाने सारा आसमंत दणाणून उठायचा. झाडावरची पाखरं भुर्रकन हवेत उडायची. साऱ्या नजरा एका क्षणात गावाच्या दिशेला वळायच्या. "आज रात्री ठीक साडे नऊ वाजता मस्त मराठी चित्रपट मुंबईचा फौजदार" सिनेमाचे नाव सांगून झाले की पुढे हमखास आवाज निघायचा, "याल तर हसाल न याल तर फसाल सकाळ उठून शेजाऱ्याला विचारत बसाल". या आवाजाने शिवारात राबणाऱ्या हातांना जोर चढायचा. आज सिनेमा बघायला मिळणार म्हणून बायका दिवस मावळायलाच चुली पेटवून स्वयंपाकाला लागायच्या. म्हातारी कोतारी माणसं सुद्धा मिळेल ते खाऊन पाराच्या दिशेने सरकायला लागायची.

दिवस मावळून अंधार पडायला लागला की सर्वांचे डोळे एस.टीच्या थांब्याकडे लागायचे. फाट्यावरून जाणाऱ्या शेवटच्या एस.टीतून टाकीवाला बाबा उतरायचा. मोठ्या सुटकेस सारख्या त्याच्या पेटीत प्रोजेक्टर, पिशवीत रीळा, वायरबोर्ड, रिकामे चक्रे, वायरा, इत्यादी साहित्य. सिनेमा ठरवून आलेली चार दोन पोर ते सामान घ्यायला हजर असायची. अंधार वाढत जाईल तसा गावात लाऊड स्पीकर वरून पुकारणाऱ्या माणसाला जोर चढलेला असायचा. ही कला काही खास लोकांनाच जमायची. यांच्या ठराविक लयबद्ध आवाजाची सगळ्या कानांना सवयच झालेली. टाकीवाला बाबा गावात शिरताना दिसला की बारकी पोरं गल्लीबोळानं टाकीवाला आला म्हणत पळायची. ज्याच्या घरी कार्यक्रमानिमित्त सिनेमा ठेवलेला असायचा. त्याच्या घरी टाकीवाल्याच्या खास जेवणाची खास सोय.

तोपर्यंत इकडे पाराजवळ रिकाम्या पटांगणावर दोन मोठे बांबू जमिनीत ठराविक अंतरावर खड्डा काढून रोवले जायचे. दोन्ही बाबूंना ताणून पडदा बांधला जाई. दुपारी दीपमाळेवर चढवलेले जर्मनी कर्णे आता खाली उतरून या बांबूवर चढून बसायचे. पडद्याजवळ तोपर्यंत लहान पोरं एकमेकांना जागा मिळेल तेथे खेटून बसायची. घरातून लवकर बाहेर पडलेली म्हातारी माणसं पोती टाकून बसायची. बघता-बघता सारं मैदान गर्दीनं फुलून जायचं. पडद्यापासून काही अंतरावर टाकीवाला प्रोजेक्टर मांडून तयारीला लागायचा. त्याला एक वर आणि खाली अशी दोन मोठी फिरणारी चक्रे जोडली जायची. वरचे चक्र रिळानी भरलेले. तर खालचे रिकामे. वरच्यातून आलेली रीळ खालच्या चक्रात जोडली जाई. मशीनवाल्याचं पडद्यावर फोकस मारून सेटिंग सुरु झालं की अंधाराचा फायदा घेऊन बारकी पोरं हळूच कुणाचे तरी पटके, टोप्या पडद्याच्या उजेडावर दिसेल असं उडवायची. लगेच "कुणाचं रं गाबडं हाय!" म्हणत शिव्यांचा भडिमार घुमायचा. दुपारपासून पुकारणारा गडी आता फडक्यात गुंडाळलेला माईक हातात घेवून आपल्या गावचे अमके-अमके जेष्ठ यांच्या हस्ते नारळ फोडतील अशी शेवटची आरोळी देणार. तोपर्यंत कोणतरी डीपीत जाऊन सगळ्या खांबावरच्या लाईटी बंद करणार. आणि इकडे रिळांचा कर-कर आवाज करीत टाकीवाल्याने प्रकाश किरण थेट पडद्यावर सोडले की सिनेमा सुरु. देवता,मुंबईचा फौजदार, थांब लक्ष्मी कुंकू लावते, भिंगरी, मोसंबी नारिंगी, पुढचं पाऊल, सांगत्ये ऐका, सोंगाडय़ा, पिंजरा, सामना, उंबरठा पुढचं पाऊल ते माहेरची साडी असे अनेक सिनेमे तेव्हा पडद्यावर गावखेड्यात लागायचे.

चंद्रकांत-सुर्यकांत, जयश्री गडकर पासून स्मिता पाटील, रवींद्र महाजन, अशोक सराफ, निळू फुले, रंजना, दादा कोंडके यांचेच हे प्रामुख्याने सिनेमे असायचे. दादा कोंडके किंवा अशोक सराफची एंट्री झाली की माणसं हसून हसून बेजार व्हायची. शिट्ट्यांचा मारा सुरु व्हायचा. तर निळू फुले आले की बायकांचा शिव्यांचा भडीमार. एखादी म्हातारी अंधारतूनच, "आला बघ किरड्याsss!" म्हणत शिव्या हासडणार. मध्येच एखाद्या वेळी कोणतरी मुसमुसणार. गावात चार-दोन बायका अशा असणार की अख्खा सिनेमा संपेपर्यँत यांची तोंड सुरूच. तर पडद्यावर मारामारी सुरु झाली की एखादा म्हातारा "हाण अजून हाणsss!" म्हणून ओरडणारच. त्यात मोक्याची क्षणी टाकीवाल्याकडून हमखास रीळ तुटणार. मग एका दमात सगळी "आरं कट करू नकं रं! मागं घे मागं!" म्हणत पुन्हा कालवा सुरू. एक रीळ संपली की सिनेमा न थांबवता दुसरी रीळ जोडणं हे फार हात चलाखीचं काम. यात काही टाकीवाले खास पारंगत. अशी न थांबता रीळ जोडून खेळ दाखवणाऱ्यास पुढची सुपारी हमखास मिळणार.

तर या सिनेमा बघणाऱ्यात काही लफडेवाले प्रेमिक हमखास असणाचे. असाच एखदा मुंबईचा फौजदार या रविंद्र महाजनीच्या सिनेमाचा खेळ सुरु असताना खालच्या आळीच्या तानीला चिकटायसाठी माळावरचा किश्या पाताळ नेसून अंधारातून बायकांच्या घोळक्यात शिरलेला. बायकांना वाटलं परगावची एखादी बाई सिनेमा बघायला आलेली असावी. अंधाराचा फायदा घेऊन किश्या तानीच्या अंगाला अंग लावून चिकटून बसलेला. किश्या म्हणजे महाबिलंदर गडी. नाना युक्त्या करणारा. पाताळ नसलेलं असल्यानं कुणालाही संशय आला नाही. चांगला अर्धा सिनेमा संपेपर्यंत अंधारात दोघांचा खेळ चाललेला. सिनेमाची मध्यांतर झाल्यावर ह्यो बी गडी बायकांच्या घोळक्यातनं शिरून लघवीला जाऊन आला. सिनेमा पुन्हा सुरु झाला. काही वेळ गेला. अन टाकीवाल्याच्या मागच्या बाजूनं अंधारातनं अचानकच आवाज आला, "तुझं मडं बसिवलं भाड्याsss! माझ्या अंगाला हात लावतुयास व्ह्य रं! आरं गड्याचा हात मला ओळखू ईना व्हय!" म्हणून धूरपा नाणी किश्याला बडवायला लागलेली. मध्यंतरानंतर तानीची जागा धुरपा नानीनं बळकावलेली. अन धुरपा नानीच्या जागी तानी बसलेली. त्यामुळे सगळा खेळाचा बेरंग झालेला. पण किश्या चलाख प्राणी. नेमकं काय झालय हे लोकांना कळेपर्यंत पाताळ सावरीत किश्या चार ढेंगात गावाशेजारच्या ओढ्यात गायब. लोकांना वाटलं ही बाईच पळतीय म्हणजे हिलाच कोणीतरी कायतरी केलं असणार. अश्या कित्येक किश्या आणि तानीच्या गोष्टी या 16 एम एम च्या सिनेमांनी खेड्यात घडवल्या. मनोरंजन करून गावे जगवली. एक ना हजार गोष्टी.

काळ बदलला. ‘व्हीसीआरने’ काही काळाकरिता हा पडदा आपल्या पोटात सामावून घेतला. नंतर-नंतर दूरदर्शनवर आठवड्यातून एखादा मराठी सिनेमा दिसू लागला. पुढल्या रविवारी कोणता सिनेमा लागणार म्हणून आठ दिवस आधीच लोकं "साप्ताहिकी" सारखे कार्यक्रम बघू लागले. नव्वदच्या दशकानंतर बदलाचे वारे खेड्यावरुन वेगाने घोंगावू लागले. इस्रोतून तंत्रज्ञानाने भरलेल्या उपग्रहाच्या सिगारेटी धूर ओकत आकाशात उंच उडाल्या. झाडावर बांधलेल्या घरट्यासारख्या कौलारू घरावर मनोरंजनाच्या छत्र्या लोंबकळू लागल्या. अल्फा मराठी, ई.टीव्ही सारखे मनोरंजनाचे शब्द नव्याने गावखेड्यातल्या डिक्शनरीत सामील झाले. हैद्राबादवरून रामोजीरावांनी सोडलेले ई.टीव्ही मराठीच्या सिग्नलचे धूर कौलारू घरावरच्या छत्र्या पोटात ओढू लागल्या. या उपग्रह वाहिन्यांनी सिनेमा खेड्यांच्या नजरेच्या टप्प्यात आणला. पडद्यावरच्या सिनेमांची क्रेझ विझू लागली. तालुक्याच्या टुरिंग टाक्या ओस पडल्या. गावात येणारे टाकीवाले फाट्यावरच्या एस.टी तून उतरताना दिसेनाशे झाले. दुपारपासून गाव दणाणून सोडणारा लाऊड स्पीकरवाल्याचा आवाज थांबला. पाराजवळ सिनेमा संपल्यावर उजाडे पर्यंत पडद्याच्या समोर झोपा लागलेली बारकी पोरं दिसेनाशी झाली. रात्रभर दोन जर्मनी कर्ण्या मधून गावाला हसवत ठेवणारा अशोक सराफांचा आवाज विसावला. तरुणींना प्रेमाची भुरळ घालणारा देखणा रविंद्र महाजनी पडद्यावर दिसेनासा झाला. बायकांना मुसमुसून रडायला लावणारा पारासमोरच्या पडद्यावरचा जयश्री गडकरांचा अभिनय थांबला. निळू फुल्यांचे पडद्यावरचे राजकारण आता प्रत्यक्ष गावा गावातच शिरू लागलं. किश्या आणि तानी सारख्या प्रेमिकांच्या भेटीची ठिकाणं आठवणीत परिवर्तित झाली. ‘टाकीवाल्या बाबाची मशीन’ श्वास विझवून कोपऱ्यातल्या अडगळीत कायमची विसावली. घरात जन्माला येणाऱ्या नव्या पिढ्यांना टाकीवाला बाबा आता जुन्या सिनेमांच्या गोष्टी शून्यात हरवून सांगू लागला. म्हणूनच मल्टिप्लेक्स, हॉटस्टार, प्राईम आणि नेटफ्लिक्सवर सिनेमे बघणाऱ्या भविष्यातील पिढ्यांना गावखेड्याच्या काळजावर कोरलेला हा ‘जादुई रिळांचा ठसा’ कधीच अनुभवता येणार नाही...

© ज्ञानदेव पोळ






2 comments:

  1. जबरदस्त गुरुजी....

    ReplyDelete
  2. मला माझा जुने दिवस आठवले

    ReplyDelete