Sunday, March 26, 2017

पांडू पाटील

4 पोरं, 3 पोरी, 21 नातवंडे, 16 परतुंड आणि अजून काही दिवस जगला असता तर खापर परतुंड बघण्याचं भाग्य लाभलेला चालता फिरता माझा आज्जा पांडू पाटील रात्री साडे दहा वाजता मातीत मिसळून गेला. 98 वर्षे जगलेला आणि जुनी चवथी शाळा शिकलेला गावातला शेवटचा दणकट म्हातारा. पण या वयापर्यंत कधी दाताला कीड लागली नाही कि डोळ्याला चष्मा लागला नाही. स्वातंत्र मिळायच्या आधी जन्माला आला तेव्हा राबायला शेताचा एक तुकडा होता आणि राहायला खणभर घर. पण दिवस रात्र राबून पंचवीस एकर जमीन केली. दोन विहिरी पाडल्या. सगळया वावरांचा कोपरा न कोपरा भिजवून काढला, आणि शहरात नोकरी करणाऱ्या पोरांना गावात चार घरे सुद्धा बांधली. म्हाताऱ्यानं प्रचंड गरिबी पाहिली, पारतंत्र पाहिलं, स्वातंत्र पाहिलं, तसं गरिबीनंतर कष्टानं मिळालेलं वैभव सुद्धा पाहिलं. पण खांद्याला खांदा लावून उन्हातान्हातून संसाराची बैलगाडी ओढणारी आणि मध्येच एका वळणावर साथ सोडून गेलेली म्हातारी म्हाताऱ्याला आतून व्याकुळ करत राहिली. पण तरीही म्हातारा वाकला नाही कि मोडला नाही. पण नियतीच्या क्रूर खेळात दोन तरणी ताटी मुलं गेली आणि भुंड कपाळ झालेल्या सुना बघून म्हातारा कोसळला. आपल्या आधीच स्मशानात जळणाऱ्या आपल्या पोरांच्या चिता पाहून म्हाताऱ्यानं केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता...

...पण म्हातारा खचणारा न्हवताच. व्हराडाचा टेम्पो उलटून खाली सापडलेला म्हातारा तुटलेल्या बरगडया छातीला जोडून जीवघेण्या दुःखातून सुद्धा उठला आणि पुन्हा मातीत राबला. खचला नाही की रुतला नाही. न्हवे रुतन्यासाठी तो पृथ्वीवर जन्माला आलेलाच न्हवताच. कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेला म्हातारा साऱ्या दुनियेच्या सुख दुःखात सामील झाला. रोज सकाळी पेपरात मान घालून सारी दुनिया म्हातारा वाचून काढायचा. यात्रा जत्रा करत काल परवा पर्यंत एकटा फिरत राहिला. ना कुणाचा जगण्यासाठी आधार घेतला, ना कुणाकडून सेवा करण्याची अपेक्षा. कधी अंगाला सुई टोचली नाही कि पोटाला औषध गोळ्या लागल्या नाहीत. कि शरीराला व्यसन लागलं नाही. मला शंभर वर्षे काय होणार नाही अशी जगण्याची इच्छाशक्ती असलेला म्हातारा काल नियतीने पाठवलेला पहिला आणि शेवटचा हार्ट आट्याक मात्र पचवू शकला नाही. आजूबाजूला प्रचंड वारा खेळत असतानासुद्धा शेवटी म्हातारा पांडू पाटील एका श्वासाला महाग झाला...


No comments:

Post a Comment