Sunday, March 19, 2017

मायानगरी

मुंबईतल्या घरांना पत्र्याचा सोफा नाही कि सोफ्यात चूल नाही. चूल असली तरी त्या चुलीत विस्तवाचा फुललेला आर नाही कि चुलीत भाजलेल्या शेंगा नाहीत. इथल्या घरांना आंगण नाही कि अंगणात तुळस नाही. दारात कुरड्या सांडग्याची वाळवण नाहीत कि वाळवणाला काठी हलवत राखण बसलेली म्हातारी नाही. मुंबईतल्या घरासमोर गुरांचा गोठा नाही कि "गोठ्यात चिळ चिळ वाजणारा धारेचा आवाज नाही. दाराला राखण करीत आडवा पडलेला राजा कुत्रा नाही कि उकिरंडयावर पायानं उकरणाऱ्या कोंबडया नाहीत. नातवडांना जत्रेला घेऊन निघालेला धोतर पटक्यातला म्हातारा इथल्या रस्त्यावर नाही कि मधल्या लेकीकडं साखरचं गठुळ घेऊन निघालेली लुगडया चोळीतली म्हातारी नाही. मुंबईत वाहणारी नदी नाही की पदराला माकडागत चिकटलेल्या पोरांसोबत धुण्याची बदली डोक्यावर घेऊन नदीला निघालेल्या बायका नाहीत. मुंबईत डोंगर आहे पण डोंगरावर गुरं घेऊन निघालेले मळक्या कपड्यातले गुराखी नाहीत कि मावळतीला दिवस कलल्यावर वैरणीचा बिंडा घेऊन घराच्या ओढीने निघालेली बिना चप्पलांची माणसं नाहीत. मुंबईत बैलगाड्या नाहीत कि चाकांच्या धावेचा करकर वाजणारा आवाज नाही. वासुदेव नाही, पिंगळा नाही, कि इथल्या रेडिओवर साधा पोवाडा सुद्धा नाही. इथे देवळे आहेत, पण त्या देवळात भजन, कीर्तनाचा घुमणारा नादमधुर आवाज नाही कि पहाटे पर्यंत चालणारा काकडा नाही. देवाच्या सोबतीला देवळात सिगारेट फुंकणारा शेंडीवाला भैय्या आहे, पण घराची चौकट पुजायचा मुहूर्त सांगणारा "सदा बामण" इथे नाही. मुंबईला पार नाही कि त्या पारावर रंगणारा जत्रेतला तमाशाचा फड नाही..

...इथे फक्त प्रचंड गर्दीतून वाटा काढत जिवाच्या आकांताने सैरावैरा धावणारी हडामासाची सुरकुतलेली माणसं आहेत. त्यांच्या अंगावरून गळणारे घामाचे थेंब पिऊन जगणारे समिंटचे रस्ते आहेत. इथे एखादया उपनगरातल्या चाळीत बोंबील विकणारी काळ्या ठिपक्यांचा गाऊन घातलेली म्हातारी आहे. तर तिच्या मागं बसलेला बर्मुड्यातला म्हातारा सुद्धा आहे. कोंबड्या आहेत पण त्या एखादया चिकन सेंटर मध्ये सोलून ठेवलेल्या आहेत. इथे सुसाट बाईकवरून गॉगल घातलेल्या ढोल्या गर्लफ्रेंडला पाठीला चिकटवून वेडी वाकडी वळणे घेत रस्त्यावरून धावणारी किडमिडी पोरं आहेत. तर मरीन ड्राईव्हच्या कठड्यावर स्क्वेअर फुटांच्या जगन्यातली घुसमट रिकामी करायला आलेली उपनगरातली तरुण जोडपी आहेत. आणि पलीकडच्या वाळूत ज्युनिअर कॉलेजच्या पोरासोबत छातीला स्तनं फुटलेली कोवळी शाळकरी मुलगी सुद्धा आहे. इथल्या वाऱ्यासोबत धावणाऱ्या अंबानीच्या मेट्रोतल्या थंडगार डब्यात, "सोबत आपले सामान घेऊन उतरा!" म्हणून साऊंडबॉक्स मध्ये ओरडणारी मंजुळ आवाजाची तरुणी आहे. तर तिचा आदेश प्रमाण माणून हेडफोनवाल्या गर्लफ्रेंडच्या खांद्यावर हात टाकून "जिवंत सामान" घेऊन उतरणारी तरुण पोरंसुद्धा आहेत. इथे सी.एस.टीच्या बिळातून निघुन सापासारखी वेडी वाकडे वळणे घेत उपनगराकडे जिवंत देहांचे सापळे घेऊन धावणाऱ्या लोकल्स आहेत. तर दादर ईस्टच्या एखादया घरात गॅसवर कुकर लावून वाऱ्याच्या वेगानं स्कुटीवरून वेस्टला पोरांना शाळेत सोडन्यासाठी धावणाऱ्या मॉडर्न मम्मा सुद्धा आहेत. तसाच एखान्द्या चाळीत आतून विस्कटलेला पप्पा सुद्धा इथेच आहे. इथे माड्या आहेत पण त्या माड्यावर शेकडो नरांना ओटी पोटावर दिवस रात्र झेलून त्याच पोटातली आग शांत करणारे कामाठीपुऱ्यातले नरकयातना भोगणारे स्त्री देहांचे उद्धवस्त झालेले सापळे सुद्धा आहेत...


No comments:

Post a Comment