Monday, January 1, 2018

जात्यात भरडलेला खंडेराव

खंडेराव खरं सांग...
तू ज्या उन्मादात रात्री दारूचे चार घोट
नरड्यात ओतून शहरातल्या रस्त्या रस्त्यांवरुन
नाचत होतास, बैलासारखा उधळत होतास
ते नाच गानं खरोखरचं होतं का?

खरं सांग खंडेराव...
रात्री पॅन्ट गळेपर्यंत पोरा पोरीत नाचताना
दूर गावाकडे तुझ्या माळरानातल्या शेताला  
तुरीच्या शेंगाच लागल्या नाहीत
हि वेदना तुला आतून छळत होती कि नाही?

खंडेराव खरं सांग...
रात्री एफ सी रोडवर फुगे हवेत सोडताना
एखांद्या क्षणी शेतातला बोंड आळ्यानी
चिंध्यासारखा जागोजागी पोखरलेला कापूस  
तुला मध्येच उडताना दिसला कि नाही?

खरं सांग खंडेराव...
रात्री व्हिस्कीचा ठसका लागल्यावर
दम्याने दिवसरात्र खोकणारा गावाकडचा मोडका बाप
आणि वेफर्स घशात विरघळताना,
वाळक्या भाकरी फोडणारी तुझी तुटकी आई
तुला शहरातल्या भर गर्दीत अंधारात दिसली कि नाही?

लपवू नकोस आतलं खंडेराव, खरं सांग...
तू जे देहभान हरवून नागासारखा रात्री फणा काढून डुलत होतास
उधळत होतास, उसना आव आणून मध्येच गर्जत होतास,
तेव्हा पस्तीशी गाठूनही
दुनियेतला एकही बाप तुझ्या गळ्यात पोरगी बांधेना,
हि आतली वेदना अंगावर घेऊनच
तू खोट्या उड्या मारल्यास कि नाहीस?

खंडेराव...
हि वर्षे बिर्षे तुझ्यासाठी कधीच बदलत नसतात
इथल्या व्यवस्थेचा आर्थिक गाडा चालवण्यासाठी
पळविलेली हि नुसती कॅलेंडरवरची पाने असतात.
मात्र तू,
वरीसभर साठणारी तुझ्या मेंदूतली “समृद्ध दु:खांची अडगळ”
अशी वर्षाच्या अखेरीस इथल्या रस्त्या रस्त्यांवर
सांडून रिकामा होत जातोस,
आणि जुन्यातून पुन्हा नव्यात घुसत राहतोस
इतकच...

#ज्ञानदेवपोळ

  

Friday, December 15, 2017

किसानानी

"आज जायाचा म्हणतुयास तर तेवढं वस्तीवरच्या किसानानीला भेटून ये! तू गावाला आल्यावर घरी पाठवून दे म्हणालीय! थकलीया आता बिचारी!" आईने असे सांगितल्या सांगितल्या मी पायात चप्पला घातल्या अन नानीच्या वस्तीची वाट चालू लागलो. वाट चालता चालता तरुणपणापासून  म्हातारपणापर्यंत जगलेली आख्खी किसानानी डोळ्यापुढे दिसू लागली. मला खुणावू लागली. तिच्यावर आता वाईट दिवस आलेत असं आईनं निघताना सांगितल्यामुळे तर मी अधिकच अस्वस्थ झालो. चालता चालता दोन ठिकाणी ठेचकाळलो. कित्येकवेळा मी लहान असताना आई मला या किसानानीकडे अंडी आणायला पाठवायची. गावात कुठे नाही पण या नानीकडे अंडी नक्की सापडायची.
नानीच्या दारात नेहमी चार म्हशी, दोन रेडकं, एक शेरडी, चांगल्या पन्नासभर कोंबड्या दिसायच्या. या नानीला सहा पोरी. अन सहा पोरींच्या पाठीवर नवसाने जन्माला लेला मारुती. आणि या मारुतीच्या जन्मानंतर काळाने उचललेला नवरा. एवढीच काय ती इस्टेट अंगावर घेऊन टेचात जगणारी किसा नानी मी लहानपणापासून पहात आलेलो. आता तुम्ही म्हणाल, “पदराला सात पोरं घेऊन बाई कशी जगली असल.तर किसा नानी जगली. अन पोरं सुद्धा जगवली. नुसत्या पोरीच पोटाला आल्यावर घराला दिवटा पाहिजेल. या नवऱ्याच्या हट्टापायी किसा नानीनं काय काय केलं सल.

तर तिनं दिवटा पोटाला यावा म्हणून सोळा शनिवार उपास केलं. नुसतं उपास करून थांबली नाही तर सोळा गावच्या सोळा मारुतीला पोरगा पोटाला येवूंदे म्हणून साकडं घातलं. आता परत तुम्हाला वाटल कि त्यात अवघड काय? पण हे सगळं तिने अनवाणी पायांनी पायवाटा, काटेकुटे तुडवत सोळा गावचं मारुती पालथं घातलं. एवढं सगळं केल्यावर मात्र दैवयोगाने म्हणा अथवा नशिबाने म्हणा पण तिच्या पोटाला मूल जन्मलं म्हणून त्याचं नाव मारुती.

या किसा नानीची वस्ती गावाबाहेरून शांत वाहणाऱ्या नदीच्या अगदी काठावरच. त्या वस्तीवर तिचं एक मातीचं दोन खणाचं घर. त्या घरात तिचा चिलिपिली घेऊन संसार. पावसाळ्यात नदी भरली कि नानीच्या घराला पाणी टेकायचं. नानी पदराला सात पोरं घेऊन अशा दिवसात रात्रभर जागरण करायची. खेड्यात कुत्र्या मांजराशिवाय, शेरडा म्हसराशिवाय घराला घरपण आहे असं वाटतच नाही. अगदी तसाच नानीचा सारा संसार या शेरडा म्हसरांनी जगविला. नानीच्या गोठ्याला कायम एक तरी दुभती म्हैस दिसायचीच. गोठ्यातलं दावं तुटू नये म्हणून नानीचा आपला जन्मभर खटाटोप चालू. पण पोरं वाढू लागली तसं पोटाचं हाल होऊ लागलं. दूधदुपत्यावर भागेना झालं.

पण नानी करारी बाई. मागं न हटणारी. आजूबाजूच्या चार गावाच्या बांधाला हाडं घासून घासून नानी पोरं जगवू लागली. रात म्हंटली नाय कि दिवस म्हटला नाय. पण उन्हाळ्यात नानीच्या हाताला काम नसायचं. मग पुन्हा पोटाचं हाल सुरु. त्यावरही नानीनं उपाय शोधून काढला. उन्हाळ्यात गावागावात लग्नसराई, यात्रा-जत्रा सुरु होतात. यात जेवणावळी उठतात. हि जेवणं बनविण्याचे काम पुरुष आचाऱ्याकडे असते. सुरुवातीला नानी या आचाऱ्याच्या हाताखाली कामाला जाऊ लागली. वरीस दोन वरीस गेलं. अन किसा नानी स्वताच आचारी बनली. तिला घरोघरी सुपाऱ्या मिळू लागल्या. त्यावर तिचं पोटपाणी पिकू लागलं. पोरांच्या पोटाला चार घास मिळू लागले. किसा नानीनं केलेल्या जेवणाला अशी चव येऊ लागली कि साऱ्या पंचक्रोशीत किसानानीचच नाव झालं. अर्थात हे सगळं पुरषाचं काम. खेड्यात अगदी आजही आचारी म्हणून पुरुषच दिसतात. ते बाईचं काम नाही अशी परंपरा. कारण अशी कामं प्रचंड अंगमेहनतीची. त्यामुळे बाईला यात स्थान नसायचं. त्याकाळी नानीनं यात स्थान मिळवलं. हजार माणसांचा स्वयंपाक केला तरी तो नानीकडून कधी बिघडला नाही.

लग्न, बारसं, जत्रा-खेत्रा, पूजा, पाठवण्या, अशा कित्येक जेवणावळीची कामं किसा नानी करू लागली. घरची कामं आटोपून नानी दिवस उगवायला कासोटा घालून खांद्यावर मोठे झारे, लांबलचक उलाथनी, परातणी, वगराळी गड्यागत खांद्यावर टाकून जेवणावळ असणाऱ्या घराकडे जाताना गल्लो गल्लीत दिसायची. चर काढलेल्या चुलवानापाशी जाळ घालत बसलेली नानी घामानं ड्बडबून गेलेली सायची. कधी कधी चरीवरच्या जाळावर रटरटत शिजलेल्या शिरा भाताच्या भल्या मोठ्या हंड्याना चार दोन गड्याना सोबतिला घेऊन खाली उतरताना दिसायची. कितीही पंगती उठल्या तरी नानीनं केलेला स्वयंपाक संपणार नाही कि त्याची चव बदलणार नाही. सारा जन्म नानीनं आचाऱ्याची कामे करून घरदार जगविलं. पोरं शिकविली. वाढविली. सहा पोरींची लग्नं केली. मारुतीचं लग्न तर दारात धूमधडयाक्यात लावून दिलं. आजही गावभर कुणाच्या घरात राबणुकीचं उदाहरण द्यायचं झालं तर ते किसा नानीचंच दिलं जातं.

दिवस मावळतीकडं निघाला होता. नानीच्या एक ना हजार आठवणीना अंगावर घेऊन मी नदी पार केली. किसानानीच्या घरासमोर पोहचलो. पण आता अंगणाची सारी कळा गेलेली. यावेळी तिच्या दारात अंगावर धावून येणारा तिच्यासारखाच तिचा करारी कुत्रा दिसला नाही कि नुसतच लोंबकळत वासे दिसणाऱ्या तिच्या गोठ्यात दुभत्या म्हशी दिसल्या नाहीत. छप्परातल्या मेढीला शेरडं दिसली नाहीत कि अंगणात इकडून तिकडे उड्या मारणारी करडं दिसली नाहीत. नाही म्हणायला मोडक्या गोठ्यात पडलेल्या डालग्याच्या भोवती चार दोन कोंबड्या फिरताना दिसल्या. मी उंबऱ्याजवळ गेलो. नानी सोफ्याला पोतं टाकून बसलेली. वयानुसार आता स्पष्ठ थकलेली दिसली. मला बघताच नानी जागची हलली. मी काही बोलायच्या आतच म्हणाली, "कसा वाट चुकलास बाबा! ये बस!" मी नानीजवळ टेकलो. म्हणाली, "मागच्या दिवाळीत यीचील वाटलं! तवा बी आला नायस! तुज्या आयला किती सांगावं धाडलं गावाव आला कि पाठीव म्हणून!" मी नानीच्या तब्बेतेची चौकशी केली. तिच्या साऱ्या पोरा बाळांची विचारपूस करू लागलो. तिच्या साऱ्या लेकी सुखात असल्याचं आणि अधे मधे येऊन तिला भेटून जातात असं कळालं. मग मी मारुती कसा आहे. गावी येतो का विचारू लागलो तर नानी बिनसली. म्हणाली, " त्येचं नाव सुदीक घिऊ नगस! त्येला आय मेलीया कवाच! घरची नगु झाल्याती त्येला!" मग मी मारुतीपाशीच थांबलो. तिथेच घुटमळलो. तर लग्न झाल्यापासून मारुती एकदाच गावी आल्याचं कळालं. तू एवढं लोकांचा बांध घासून त्याला शिकवलंस. वाढवलस मग तो नेमका असा का वागतोय हे तरी विचारलस का? तर माझा प्रश्न पकडून नानी म्हणाली, "पोरगं मस्त चांगलं हूतं रं पण त्याला बाईल चांगली नाय भिटली! चांगली शिकली सावरली म्हणून केली तर ठाणवीनं पोर नासीवलं बघ! दोन वरसात आय जिती हाय का मेलीय ते बी बघाय आलं नाय! बायकुचा बैल झाला बघ भाड्या!" मी हबकलोच.

तू गेलीस का कधी तिकडं? तू विचारलस कधी त्याला? असा का वागतोस म्हणून? तर म्हणाली, "थोरल्या पोरीबर बळबळच एकदा गेली बघ तिकडं! तर भाड्या चार शबुद बोलला बघ कसातरी! ते बी जीवावर आल्यावानी! आयं कशी हायस म्हणून सुदीक ईचारलं नाय! माणसाचा यंत्र झाला बघ भाड्या! रात उजाडली कि गावची एस.टी धरली बघ!" नानी स्वगत बोलल्यासारखी एकसारखी बोलत राहिली. नंतर खोल खोल आत कुठेतरी बुडत निघाली. मी नुसतं ऐकत राहीलो. साठलेल्या नानीला रिकामं करत राहिलो. नानी काय बाय बोलतच राहिली. नंतर नंतर मलाच विचारू लागली, "मारुती असा का वागत असल रं? त्याला आपलं घर, आपलं गाव, आपला गोतावळा का नकोसा झाला झाला असल? तुमी शिकल्या सवरलेली पोरं अशी का वागता रं? का तुमाला तुमचा जीवघेणा भूतकाळ नकू वाटतोय? तुमी तुमच्या जुन्या दारिद्र्याला का लपवू पाहताय? सांग माझं चुकलं तरी काय? मला काहीच कळेना. शब्दच फुटेना. तिच्या प्रश्नांना माझ्याकडे उत्तरे होतीच कुठे?

अंधार पडून बाहेर चांगलाच काळोख दाटला. मी जायला निघालो. नानी भिंतीचा आधार धरून उठली. तिचे गुडघे काळानुसार आता तिला साथ देत नव्हते. धरपडत आतल्या खोलीत शिरली. अन पिशवीतून काय तरी घेऊन आली. म्हणाली, "दहा बारा देशी अंडी हायती! आता कोण हाय बाबा खायला! अन तुला दुसरं द्याला तरी माझ्याकडं आता उरलय तरी काय? नको नको म्हणत असतानाही तिनं दिलेली पिशवी हातात घेऊन मी उंबऱ्याबाहेर पडलो. तर डोक्यात प्रश्न. कासानानीनं हे सगळं जगणं कसं काय पेललं असेल? कशाच्या बळावर हे तिनं सोसलं असेल? तिच्या जगण्याच्या प्रेरणा तरी कोणत्या असतील?  मला न कळणाऱ्या अश्या कोणत्या बळावर ती  जगत असावी? शेकडो प्रश्न. मी तिचा निरोप घेतला. तिला पुन्हा पुन्हा म्हणायचं होतं, "सांग माझं काय चुकलं!" पण हे सगळं ती नुसतच आतल्या आत म्हणत राहिली. मी चालू लागलो. माघारी वळून बघण्याचं धाडसच होईना. कारण ही गोष्ट एकट्या किसानानीची नाहीच मुळी. तर घराघरात जगणाऱ्या शेकडो किसानानींची ही गोष्ट आहे. जगात अशा कित्येक नानी रोज स्वतःला बळी देत असतील. हा कशाचा परिणाम म्हणायचा? बदललेल्या काळाचा कि चटक लागलेल्या शहरी जगण्याचा? अनेक विचारांची डोक्यात घुसळण सुरु झाली. काळोख चांगलाच दाटू लागला. नदीकाठला रातकिडे ओरडू लागले. नदीच्या झाडीतून दूर दिसणारा 'मारुतीच्या' देवळाच्या कळसावरचा दिवा लुकलुकू लागला. मला काहीही करून उद्या दूर सिमेंटच्या जंगलात पोहचायचं होतं. मारुतीसारखंच तिथल्या यंत्रमानवात मला मिसळायचं होतं. या क्षणी माझ्यात असलेला माणूस तिकडे नेऊन यंत्रमानवात विसर्जित करायचा होता. पायाची गती वाढवली. समोर अंधाराचा ढीग पडलेला. कापीत निघालो. तोडीत निघालो. पण डोक्यात नानीचा निरोप घेताना तिने सांगितलेलं शेवटचं वाक्य अजून घुमतच होतं - "त्येला म्हणावं कायमचं गाव इसर! आय इसर! सारी दुनिया इसर! पण निदान माज्या माघारी बहणीसनी तरी ईसरु नगोस! त्यास्नी माहेरात तुज्याशिवाय कोण नाय!"

#ज्ञानदेवपोळ 
फोटो सौजन्य: shutterstock.com 

Monday, December 4, 2017

माहेर

माहेर हा शब्द कळायला स्त्रीचाच जन्म घ्यावा लागेल. माहेर आणि स्त्रीचं नातं हे अनादि अनंत काळापासून कधीही न संपणारं. युगाने युगे चालत आलेलं. खेड्यात तर माहेर या शब्दाला विशेष वलय. लग्नसराई संपली कि पावसाळा सुरु होतो. खेड्यात शेतातील कामांना मग प्रचंड जोर. काही काळातच पिकं टरारून वर येतात. अशातच नवीन लग्न होऊन सासरी गेलेल्या पोरींना वेध लागतात ते माहेराचे. लग्नानंतर स्त्रीचे सारे जीवनच बदलते. उठ सुठ कधीही तिला माहेराला जाता येत नाही. मग ते कितीही जवळ असेना. खेड्यात त्यासाठी रीतीरिवाज ठरलेले. कृषीजनांच्या संस्कृतीत रीतीरीवाजाना  विशेष महत्व. ते सर्वांनी पाळायचेच. श्रावणापासून ते पंचीमीच्या सणापर्यंत. आणि पुढे गौरी गणपती, दिवाळीपर्यंत या नव्या सासुरवाशिणीना ओढ लागते ती माहेरांची.

माहेरात येताना रिकाम्या हाती येता येत नाही. त्यासाठी रिती ठरलेल्या. त्या पाळायच्याच. पहिल्यांद्या माहेरात येणाऱ्या सासुरवाशिनी सोबत दुरड्या घेऊन माहेराकडे जायला निघतात. पूर्वी बैलगाड्यांनी या सासुरवाशिनी माहेराला येत. या बैलगाड्या बांबूच्या काब्यांनी गोलाकार आकार देऊन झाकलेल्या असायच्या. गावांच्या वेशी त्यांच्या स्वागताला सदैव तत्पर. बैलगाडी घरापुढे थांबली कि पहिली खाली उतरणार ती सासुरवाशिन. मग दुरड्या उतरणार. बंधूची गाडी गोठ्याला सुटणार. तोपर्यंत दाराला उभी असलेली कर्ती म्हातारी नातीची दृष्ट काढणार. निदान भाकरीचा तुकडा तरी ओवाळून टाकणारच. यात अंधश्रद्धा नाही. असणार ती श्रध्दाच. मग सासुरवाशिनीच्या गालावरून जुन्या हातांची बोटे मोडली जाणार. एव्हाना साऱ्या गल्लो गल्लीत बातमी. मग लहान पोरासहित भावकीतल्या बायकांची पळापळ. “अमक्या तमक्याची लेक आली गं!” तोंडी एकच वाक्य.

सासुरवाशिनींची पावलं माहेरच्या उंबऱ्याला लागली कि साऱ्या खेड्यात असच स्वागत. गावची लेक ती आपलीच लेक. तिचं सुख ते आपलं सुख. तिचं दु:ख ते आपले दु:ख. हीच खेड्याची संस्कृती. रीत. परंपरासुद्धा. त्यात आपलेपणा. मायेचा ओलावा काठोकाठ भरलेला. मग दुरड्या सोडण्याची धावपळ. दुरड्या सोडण्यास इतर स्त्रियांना बोलविण्यासाठी भावकीतील खास बाईची नेमणूक. ती चार पाऊलात एका वेळी पाच घरात निरोप देणार. खेड्यात अशी वेळेत कामं करणाऱ्या काही खास स्त्रीया. मग सगळीकडे हळदीकुंकवासाठी पळापळ. सासर माहेरच्या परिस्थितीनुसार या दुरड्यांची संख्या ठरलेली. अगदी एका दुरडीपासून ते पाच पंचीवीस पर्यंत ही वाढत जाणारी संख्या. हळदी कुंकू, पान, सुपारी, पीस नारळ हे मात्र ठरलेलंच. एखांद्या दुरडीत पुरण पोळी, तर दुसरीत करंज्या लाडू. आम्ही याला कानवले म्हणत असू. म्हणजे अजूनही तसेच म्हणतो. आपल्या माणसात. मात्र खेड्यात नावं घेतल्याशिवाय या दुरड्या सुटत नाहीत. काळानुसार दुरडीचा “डबा” झाला. पण हीच रीत अजूनही. नांव घेणं या शब्दाला “माहेर” या शब्दा इतकच वलय. तितकच वलय एखांद्या लुगडे चोळीतल्या म्हातारीने घेतलेल्या अंलकारीक लांबलचक नावाला. तिच्या शैलीला. आणि तिच्या खणखणीत आवाजाला. यात जुन्या स्त्रिया पारंगत. एकीकडून दुसरीकडे काळानुसार चालत आलेला हा पारंपारिक लाखमौलाचा ऐवज. जुन्या संस्कृतीकडून पुढ्च्या पिढ्यांना मिळालेला. मग एकमेकींच्या “रावांचं” नांव घेण्याची प्रचंड स्पर्धा. मग एखांदीचा “राव” भांडखोर का असेना. पण नाव घेताना जपायची ती संस्कृती. बाकी कैक गोष्टींना इथे थारा नाही. अगदी एका ओळीपासून ते दहा ओळीपर्यंत ह्या वाढत जाणारी शब्दांच्या लयबद्ध राशी. पण सर्वांना उत्सुकता एकच. नव्या सासुरवाशिनीच्या नावाची. तिचं लाजत मुरडत नांव घेणं हा कित्येक डोळ्यांचा कौतुकाचा विषय...

माहेरी या सासुरवाशिणीचं किती कोड कौतुक. त्यांच्यासाठी खास पुरणपोळीचं गोड जेवण. तुटलेल्या मैत्रिणी जवळ आल्या कि गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु. त्यात  मंगळागौरीची गाणी चालत.  फुगडयाचा फेर धरला जाई.  पंचमीला वडाच्या झाडाला झोके बांधले जात. त्या झुल्यावर झुलणं होई. झोक्यावरून सासर माहेरच्या सुख दुःखाची गाणे चालत. अखेर सासुरवाशिणी सासरला जायला निघतात. त्यावळी दाटून आलेले कितीतरी कंठ खेड्यांनी उघड्या डोळ्यांनी पहिले असतील. बहिणाबाईनी तर “लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते!” असं उगीच नाही म्हंटलं.

काळ बदलला. खेडी बदलली. संस्कृती बदलली. जुनं पिकत गेलं. तसं नवं उगवत गेलं. स्त्री साठी सारं काही बदललं. पण बदललं नाही तिच्या काळजातलं “माहेर”. माहेराविषयीचं स्थान. प्रेम. जिव्हाळा. आपुलकी. आणि ओढ सुद्धा. पण पूर्वीसारख्या सासुरवाशिनी आता बैलगाडीने येत नाहीत. वेशीतून आत येताना पूर्वी येणारा बैलांच्या गळ्यातील घुंगराचा आवाज आता रस्त्या रस्त्यातूवरून होत नाही. काळानुसार बदल अपरिहार्यच. बैलगाड्यांच्या धावांच्या “कर कर” आवाजाची जागा आता “अपोलो, सीयाट” सारख्या रबरी टायरांनी घेतलीय. माहेरांच्या भेटीसाठी लागणारा वेळ या रबरी टायरांनी आता जवळ आणलाय. आता सासुरवाशिनी आल्यावर गल्लीतले इतके लोक गोळा होत नाहीत. जितके ते पूर्वी व्हायचे. पण माहेरची ओढ स्त्री साठी अजून तितकीच टिकून आहे.

तीच ओढ शहरांतही. नव्या शिक्षणाने आणि सुधारणांनी शहरांकडे लोंढा वाढला. परिणामी नव्या स्त्रीचं सासर आणि माहेर दोन्ही आता शहरातच. या नव्या स्त्रीने जुन्या परंपरा मोडून काढल्या. नव्या डोक्यात घातल्या. रुद्राक्ष संस्कृतीतून द्राक्ष संस्कृतीकडे तिचा प्रवास झाला. पण माहेरी जाण्याची ओढ? अजूनही तितकीच. मग एखांद्या शहरात सासर ईस्टला आणि माहेर वेस्टला का असेना. नव्या काळातही स्त्री साठी माहेरची ओढ तशीच राहिली. म्हणून दूर एखांद्या जत्रेतून देवाचा गुलाल बुक्का आणि मुठभर चिरमुरे बत्ताशे गाठीला बांधून आई बापाकडे माहेराला घेऊन निघालेली खेड्यातली अशिक्षित स्त्री असो कि, युरोप अमेरीकीतून इथल्या शहरात परतल्यावर आलिशान टॉवर मध्ये राहणाऱ्या आई बापांकडे नवनवीन वस्तू घेऊन सिमेंटच्या रस्त्यावरून निघालेली आधुनिक स्त्री असो. दोघी आजही तितकच माहेरावर प्रेम करतात. म्हणूनच काळ कितीही बदलेल. जग बदलेल. सारी दुनिया बदलेल. स्त्रीच्या दृष्टीने सारे काही बदलेल. पण बदलणार नाही ते फक्त आणि फक्त “माहेर...”Wednesday, November 22, 2017

समाजातला बळी

लीना अचानकच स्टेशनवर भेटली. तीही तब्बल पंधरा वर्षानंतर. तिनंच मला प्रथम ओळखलं आणि जवळ आली. सत्य स्वप्नापेक्षा किती कठोर असतं हे त्या दिवशी मला समजलं. तिच्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. “तू कुठे असतोस, मी कुठे असते” याची चौकशी झाली. ती मुंबईतच नोकरी करीत असल्याचं समजलं. मला या अनपेक्षित भेटीचं आश्यर्यच वाटत होतं. कारण ती आणि मी प्राथमिक शाळेपासून एकत्र शिकत होतो. पुढे कॉलेजमध्येही काही काळ एकत्र होतो. तेव्हापासूनच आमच्यात मैत्री बनली. पण मैत्रीचं आणि प्रेमाचं नातं जवळ-जवळ असतं ना. ते कधी आणि केव्हा निर्माण झालं ते दोघांनाही कळलं सुद्धा नव्हतं.

लीना मानेबाईंची मुलगी. मानेबाई माणदेशातल्या. पण मुख्याध्यापक म्हणून बरीच वर्षे गावच्या प्राथमिक शाळेत नोकरीस होत्या. लीना एका श्रीमंत प्रतिष्ठित घरातली एकुलती एक मुलगी. तर मी दलित जातीतील गरीब घरचा मुलगा. माझे आईवडील लहानपणीच देवाघरी गेल्यामुळे माझा शालेय जीवनाचा सर्व खर्च मानेबाईनीच केलेला. त्यांनीच मला शिकवलं. वाढविलं. पुढे प्राथमिक शिक्षण संपलं. लीना तालुक्याच्या गावी माझ्यासोबत कॉलेजात येऊ लागली. पण लहानपणापासूनच एकत्र वाढल्याने पुढे पुढे सहवासातून तिचं आणि माझं एकमेकांविषयीचं आकर्षण खूपच वाढत गेलं. परुंतु माणसाला प्रेम सुद्धा एका मर्यादेपलीकडे करता येऊ नये असाच या जीवनाचा नियम असावा. कारण मला आता उमजलं होतं कि  आमच्या प्रेमात जाती धर्माची बंधने आ वासून उभी राहणार. आमचं शिक्षण संपलं. मानेबाई मला नोकरी मिळाव्यात म्हणून धरपडत होत्या. तर लीना मी मिळावा म्हणून अनेक क्लुप्त्या लढवत होती. मी मात्र जीवन मरणाच्या कात्रीत सापडलो होतो. मानेबाई आमच्या लग्नास होकार देतील याची मुळीच खात्री नव्हती. शिवाय जरी दिली असती तरी त्याचं समाजातील स्थान, त्यांची प्रतिष्ठा या सर्व गोष्टीना समाजाच्या दृष्टीने कलंक लागणार होता.

एका सायंकाळी लीना अचानकच मला भेटली. म्हणाली, “आपण येथून दूर जाऊन लग्न करू! जेथे धर्म रूढी या गोष्टीना आजीबात थारा नसेल तेथे जाऊ! पण तू मला कधीही सोडून जाऊ नकोस! मी कधीही तुझ्याविना सुखी होणार नाही!” मी त्या दिवशी तिची कशीतरी समजूत घातली. पण मानेबाईसमोर विषय काढण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. अखेर लीनानच हे प्रकरण बाईपर्यंत पोहचविलं. बाईनी मला घरी बोलविले. लीनालाही सोबत बसविलं. आमच्याकडे पहात म्हणाल्या, “सुगरण आपल्या पिलांसाठी एक काडी काडी गोळा करून खोपा विणते. प्रसंगी उपाशी राहून ती कण कण चारा आणून त्यांना भरवते. कारण तिलाही वाटत असतं. आपल्यासारखच यांनाही उडता यावे. पण तिच पिल्ले जर मोठी झाल्यावर सुगरणीस टोच्या मारून जखमी करू लागली. घायाळ करू लागली. लांब लांब उडू लागली तर सुगरणीच्या अंतरंगाला होणाऱ्या वेदना खूप भयानक असतात. तुम्हाला नाहीत त्या सांगता येणार? त्यांचे डोळे पाण्याने भरले होते.

स्वप्नाचं जग आणि वास्तवातील जग खूप निराळं असतं. म्हणून तर हि दोन जगे कधीच एक होऊ शकत नाहीत. माझ्या दृष्टीने लीना म्हणजे आकाशाला लागलेलं एक फुल होतं. कितीही उंच भरारी घेऊनही त्या फुलाचा गंध मला मिळणार नव्हता. पुढे चार आठ दिवसातच बाईंची दूर कुठेतरी बदली झालेचं समजलं. लीना मला भेटायला आली. म्हणाली, “जुन्या आठवणीना सुद्धा खूप वास असतो रे! त्या आठवणीही काही कमी समजू नकोस!” हेच तिचे अखेरचे शब्द ठरले. लीना कायमची नजरेआड झाली. अन मी शहरांकडे वळलो.  

आज अचानकच इतक्या वर्षांनी ती समोर आली. खरं तर अगदी आजपर्यंत मला तिच्या नसण्याची आणि या जगाच्या असण्याची सवयच होऊन गेली होती. कारण कॉलेजची प्रेमे म्हणजे तात्पुरती ऐट असते. तात्पुरता डामडौल असतो. पुढे प्रेमे उडून जातात. कोणाची कोठे तरी लग्ने होतात. आणि तिकडे विसरून गेलेल्या आपल्याच प्रेयसीला दुसऱ्याच कोणाकडून तरी, तितकीच गोजिरवाणी पोरंबाळं होत राहतात.अशा कित्येक समजुतीनी या साऱ्या गोष्टी आता अंगवळणी पडत गेलेल्या. पण “प्रीती म्हणजे काही निर्जीव वस्तू नव्हे कि जी सोडली कि संपली. तिचे धागे कुठेतरी खोल अंतरंगात गुंफलेले असतातच.” लीना सुखी असेल. सारं काही विसरली असेल. तिचा संसार तिने आता उभा केला असेल. असे मला अगदी त्या क्षणापर्यंत वाटत होते. पण यातले काहीच खरे नव्हते. वयाची चाळीशी  गाठल्यानंतरही तिने लग्नच केले नसल्याचे समजले. पण का नाही केले याचे उत्तर मला तिने दिलेच नाही. पुन्हा पुन्हा याच विचारल्या गेलेल्या प्रश्नाने ती अधिकच अस्वस्थ होत गेली. अबोल झाली...

मला मानेबाईंची आठवण झाली. जरी त्यांनी आमच्या लग्नास विरोध केला असला तरी त्यांच्यामुळेच मी आज पांढरपेशा समाजात वावरत होतो. मानेबाई तसं थोर आदर्श व्यक्तिमत्व. गोरगरीब लोकांबद्दल त्यांना नेहमीच खूप जिव्हाळा. आपुलकी. आणि प्रेम. त्या केवळ शाळेतच शिकवत नसत. तर आजूबाजूच्या इतर स्त्री पुरुषांनाही त्या संसाराविषयीचे सल्ले देत. त्यामुळे समाज आणि त्यांच्यात एक वेगळ्याच प्रकारचे नाते निर्माण झाले होते. त्या जिल्हास्तरीय एड्स जनजागरण मोहिमेतही काम करत होत्या. गावात त्यांच्याच प्रयत्नाने प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती झालेली. स्त्रियांनी शिक्षण घेऊन स्वावलंबी बनले पाहिजे हि त्यांची प्रामाणिक इच्छा. गरिबीमुळे एखांदे मुल शिक्षण घेत नसेल तर त्या स्वखर्चाने त्यांना शाळेत पाठवीत.

मी लीनाला बाईविषयी विचारले. त्यांच्या तब्बेतीविषयी विचारले. बाई आता रिटायरमेंट नंतरचं आयुष्य सुखात जगत असतील. या विचारात मी होतो. तर लीना रडायलाच लागली. मी अवाक होऊन तिच्याकडे पाहू लागलो. अखेर बऱ्याच वेळाने तिच्याकडून बाई आता तुरुंगात असल्याचे समजले. मला एकदम धक्काच बसला. ती सांगू लागली, “आईचा समाजाने बळी घेतला रे! आयुष्यभर ती खूप प्रामाणिक राहिली! आयुष्यात वाईट विचार असा कधी तिने केलाच नाही रे! आईची बदली झाल्यानंतर आम्ही ज्या गावात रहात होतो. त्या शाळेमध्ये तिने लहान मुलांना स्वखर्चाने मोफत दुध वाटण्याची योजना सुरु केली. गावातलेच दुध विकत घेऊन ती शाळेत मुलांना वाटत असे. एकदा असेच वाटेत कुणीतरी दुधामध्ये कीटकनाशक ओतले. ते दुध पिल्याने शाळेतील दोन मुले दगावली. गावातील काही लोकांनी आईनेच दुधामध्ये कीटकनाशक ओतल्याची पोलीस केस दिली. पोलीस आईला घेऊन गेले. न्यायालाने तिला दहा वर्षांची शिक्षा दिली.

मला फारच वाईट वाटले. माझे डोळे भरून आले. इतक्यात स्टेशनवर लोकलचा हॉर्न वाजला. तिने माझा निरोप घेतला. पण जाता जाता रविवारी घरी येण्याचा आग्रह केला. म्हणाली, “मला तुझ्याशी खूप बोलायचय! मी वाट पाहीन!” ती क्षणात पाठमोरी झाली. खट खट आवाज करणाऱ्या त्या लोकलकडे मी कितीतरी वेळ तसाच पहात उभा होतो. सफल न होणाऱ्या प्रेमाचे दु:ख किती असह्य असते याची प्रचीती मला त्या क्षणी झाली.

पण खरच तिने सांगितल्याप्रमाणे मी तिला भेटायला जाणार होतो का? मला भेटायला बोलावून तिला नेमके काय सांगायचे असेल? तिला भेटून तिच्या तळात गेलेल्या आठवणीना मी पुन्हा वर काढणार होतो का? तिने आजपर्यंत का लग्न केले नसेल या भविष्यात मला छळणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मी तिच्याकडून घेणार होतो का?... मला यातलं काहीच माहित नव्हतं...

मी घरी आलो. एकीकडे लीना आणि दुसरीकडे मानेबाई काही केल्या दोघीही मेंदूतून जाईनात. मला बाईबद्दल तर खूपच दु:ख झाले. आपल्या बाई या सर्व सामान्यांच्या बाई आज कारण नसताना तुरुगांत शिक्षा भोगत आहेत. ज्यांनी आपल्याला शिकवले. वाढविले. आपण त्यांनाच कसे काय विसरू शकलो? नंतरच्या कित्येक वर्षात आपण कधीच मानेबाईंची साधी चौकशीही का केली नसावी? माने बाई जन्मालाच आल्या नसत्या तर? आपण आज कुठे असतो? आपण प्रेमात इतके कसे काय आंधळे झालो? कि सारा दोष आपण बाईनांच द्यावा? माणूस इतका कसा निष्ठुर असू शकतो? अनेक प्रश्न माझ्या मेंदूत गरगर फिरू लागले.

नंतरच्या मंगळवारी मी बाईंची भेट घ्यावी. त्यांना आपुलकीने चार शब्द सांगावेत. त्यांना तेवढेच बरे वाटेल म्हणून सर्व पोलीसी औपचारिकता पूर्ण करून मी तुरुंगात गेलो. मला मिळालेल्या वेळेत मी गडबडीने त्यांच्या अंधाऱ्या खोलीजवळ पोहचलो. पण समोरचे दृष्य पाहून बाई ऐवजी मलाच कसे त्यावेळी वेड लागले नाही हेच मला आज कळत नाही. मानेबाईनी आपले केस गळ्यात मोकळे सोडले होते. आणि रिकाम्या भिंतीकडे पहात मोठ्याने “हाss हाss करीत त्या हसत होत्या. मध्येच इतर अपराधी स्त्रियांना हाताची बोटे मोजत काहीतरी शिकवत होत्या. मी लोखंडी जाळीजवळ गेलो. चकित होऊन बाईना हाक दिली, “बाईss! मी आलो आहे, तुमचा विद्यार्थी! इकडे. इकडे. माझ्या आवाजाने बाई लोखंडी खिडकीजवळ आल्या. माझ्याकडे निरखून पाहिलं. क्षणभर थांबल्या आणि म्हणाल्या. “बाळा आज दुध संपले आहे, उद्या ये! आणि येताना माझ्या लीनाला घेऊन ये! मी तुमचा ‘आंतरजातीय विवाह’ लावून देणार आहे.” मी आवक झालो. नुकतीच मान हलविली आणि माघारी फिरलो. विचार करीत... समाजात हकनाक बळी गेलेल्या मानेबाईंचा?

#ज्ञानदेवपोळ

Monday, November 13, 2017

वशा सुतारगेल्या काही दिवसापासून मी प्रचंड अस्वस्थ आहे. कशातच लक्ष लागत नाही. आता तुम्ही म्हणाल नक्की कधीपासून. तर वशा सुतारानं गळ्याला फास लावल्यापासून. आता परत तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या लोखसंख्येच्या देशात कोण ह्यो वशा सुतार? आणि त्याच्या मरणाचं कौतुक ते काय?  पण तुम्ही काहीही म्हणा. कारण...

एकेकाळी सुतार, न्हावी, चांभार, कुंभार, मातंग, लोहार, सोनार, गुरव असे अनेक बलुतेदार कृषीसंस्कृतीचा एक भाग होते. त्यांनी गावाची सेवा करायची. त्या बदल्यात पसामूठ धान्य त्यांना मिळायचे यावरच त्यांच्या कुटुंबाची गुजराण. काळाच्या ओघात बलुतेदारी संपली. कृषीजनांच्या संस्कृतीत हे घडणं स्वाभाविकच होतं. ती तशीच टिकून रहावी याचं समर्थन आता कोणीच करणार नाही. बैलगाड्या, हातगाड्या, वाड्यांचे लाकडी खांब, तुळया, चौकटी, दारे, लाकडी घाणे, मेणे, पालख्या, शेतीसाठीची औजारे अशी अनेक कामे सुताराला करावी लागत.

पण काळ बदलला. बदलाचे वारे खेड्यापाड्यावरून घोंगावू लागले. घरोघरी नवीन तंत्रज्ञान घुसू लागले. बलुतेदारीच्या जीवावर चालणारी कित्येक खेडी तंत्रज्ञानाच्या रस्त्यावरून सुसाट धावू लागली. लाकडी कुळव, कुऱ्या, बैलगाड्या, कोळपणीची अवजारे बनवणाऱ्या सुतारांच्या हातातली "तासनी" थांबली. सगळीकडे आधुनिक लोखंडी अवजारे दिसू लागली. गावकीच्या व्यवसायावर जगणाऱ्या हातांना काम मिळायचे बंद झाले. वशा सुतारासारखे कित्येक कारागीर उपाशी पडू लागले. ज्यांची बाराखडीशी ओळख होती त्यांनी गाव सोडलं. शहरात जाऊन फर्निचरच्या दुकानात काम धंदा शोधू लागले. चार दोन रुपये गावाकडे पाठवून आपली पोरंबाळ शाळा शिकवू लागले. पण ज्यांची बाराखडीशी ओळख कधी उभ्या जन्मात नव्हती त्यांचं काय झालं? तर काहीजण खेड्यातच पुन्हा छोटी मोठी कामे शोधू लागले.

त्यातीलच एक वशा सुतार. वशा गावचा बैत्याचा सुतार. बलुतेदारीवर मिळणाऱ्या पसामूठ धान्यासाठी त्याच्या कितीतरी पिढ्या खपलेल्या. त्याचं तेच जगण्याचं साधन. पण काळाच्या ओघात गावकीच्या तुकड्यावर भागेना. पोटाचे प्रचंड हाल. मग लाकडी अवजारे बनविण्याचं साहित्य पाठीवर टाकून खेडोपाडी उन्हातान्हात कामं हुडकत गावोगावी फिरत राहिला. मिळतील त्या पैशावर लोकांची काम करू लागला. वेळप्रसंगी रोजंदारीवर राबू लागला. आपल्या कित्येक पिढ्या यात खपल्या. निदान पोराबाळाचं आयुष्य सार्थकी लागावं. त्यांनी शिक्षण घेऊन शहरात नोकरी धरावी. यासाठी चार रुपये बाजूला काढू लागला. दरम्यानच्या काळात खेड्यापाड्यात सहकारी संस्थांचे जाळे पसरू लागले. गावोगावी सहकारी पतसंस्था उगवू लागल्या. बँकांची दारे उघडू लागली. यात लोकं आर्थिक व्यवहार करू लागले. सावकारदारीला हादरे बसले. त्यात अडकलेल्या लोकांची सुटका झाली. लोकांचा पतपेढ्यावर विश्वास बसू लागला. महिन्याकाठी गावोगावी फिरून मिळणाऱ्या उत्पनातील काही हिस्सा वशा सुतार पतपेढीत साठवू लागला.

काळ पुढे धावत राहिला. पोरंबाळ मोठी होत गेली. काळासोबत वशा सुतारही थकत गेला. पोरं शिकली. लग्नाला आली. तरी त्यांच्या हाताला काम मिळना. पोरगीच्या लग्नाला स्थळ येऊ लागली. पतपेढीतले पैस दामदुप्पट झाले असतील या भाबड्या आशेवर तो अजून तग धरून होता. पण घडलं भलतंच. पुढाऱ्यानी खेडोपाडी उभ्या केलेल्या या सहकारी संस्था बुडू लागल्या. भ्रष्टाचाराचा मोठा पूर खेड्यावरुन वाहू लागला. संचालकांनी स्वतःचे कर्जदार नातेवाईक मालामाल केले. स्थानिक दैनिकांचे मथळे भरू लागले. वार्ताहराना सुगीचे दिवस आले. “असा केला भ्रष्टाचार” “अशी वाटली बोगस कर्जे”. कित्येक दिवस बातम्या झळकत राहिल्या. कित्येक वशा सुतरासारख्याचे पैसे या संस्थात बुडाले. वशा सुताराने याचा धसका घेतला. उरलेलं आयुष्य  अंथरुणावर पडून राहिला. शरीराने खंगत गेला. मनाने मुका होत गेला. गावकीशी कायमचं नातं  तोडलं. साऱ्या संसाराचाच विस्कुट झाला. एक ना शेकडो जणांचे पैसे बुडाले. ते कधीतरी मिळतील या आशेवर पुढे वशा किती तरी वर्षे तग धरून राहिला. त्याच्या सारखे इतर अनेकजण पतपेढ्यांचे उंबरे झिजवत राहिले. पण कुलपे निघालीच नाहीत. अखेर वशा सुताराने गळ्याला कासरा लावल्याची बातमी गावोगावी झळकली.

आज अशी अनेक बंद पडलेली पतसंस्थांची कार्यालये खेडोपाडी तुम्हाला दिसतील. त्या बंद कुलपांच्या आत असलेल्या रजिस्टरावर कित्येक वशा सुतारांच्या जळून गेलेल्या उपाशी आतड्यांची राख पसरलेली दिसेल. सहकारी संस्थांचे जाळे उभे करून लुबाडणारे छोटे मोठे लिंबू टिंबू पुढारी आता चार चाकी गाड्या हवेत उडविताना तुम्हाला दिसतील. पतपेढ्या ओरबाडून अंगावर चढवलेल्या त्यांच्याच मणभर दागिन्यांना आता प्रतिष्ठेचं वलय प्राप्त झालंय. बऱ्याच जणांनी आता “साहेब” “राजे” ही पदवी गावोगावी प्राप्त केलीय. उरलेले उपटसुंभ आमदार खासदारांच्या सोबत वावरताना दिसतात. पण वशा सुतारासारख्या कित्येक गरीब बलुतेदारांच्या संसाराची राखरांगोळी झाली त्याचं काय? पान भरून रोज 'मी लाभार्थी" च्या जाहिराती दाखवणाऱ्या इथल्या कित्येक सरकारांना वशा सुतारासारख्यांना लाभार्थी का बनवता आलं नसेल? किमान अशा कित्येक कारागिरांच्या कौशल्याचा उपयोग करून त्यांच्या हातांला नव्या संधी देण्याचं कामसुद्धा इथल्या राजकीय व्यवस्थाना कधीच का जमलं नसावं? कित्येक उद्ध्वस्त झालेल्या कुटूंबांचं काय? पाणी पिऊन उपाशी झोपलेल्या त्यांच्या चिमुकल्या पोरांचं काय? आणि यातून निर्माण झालेल्या भविष्यकालीन जीवघेण्या प्रश्नाचं काय?...

...शेवटी अशा अडाणी वशा सुतारासाठी काळ थांबणार तरी किती? त्याला त्याचा म्हणून वेग असणारच कि? आहो आता सगळंच अश्यक्य! कारण जागतिकीकरणानं आपण गतिमान झालोय ना?  मग लोकशाहीत हे सारं चालायचंच... नाही का???

#ज्ञानदेवपोळ
फोटो प्रातिनिधिक, सौजन्य: नितीन